Mumbai

Mumbai Crime: “महिलेचा फोटो, ब्लॅकमेलिंग आणि…” तुतारी एक्स्प्रेसमधील सूटकेस हत्या प्रकरणात नवीन तथ्य समोर आले

News Image

मुंबईतील दादर सूटकेस हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. अर्शदच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आता त्याची पत्नी रुखसानाला अटक केली आहे. ४ ऑगस्ट रोजी अर्शदची हत्या करण्यात आली, आणि त्यानंतर त्याचा मृतदेह दादरच्या तुतारी एक्सप्रेसमधून नेण्यात येत होता. पोलिसांना या दोघांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी त्यांना अटक केली. आता या प्रकरणात अर्शदच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय घडली?

दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ११ वर दोन मूक बधिर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होत्या. त्यांच्या सोबत एक ट्रॉली बॅग होती. बॅगेच्या वजनामुळे त्यांना गाडीमध्ये चढवताना प्रचंड कष्ट झाले. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलिस अंमलदार माधव केंद्रे गस्त घेत असताना त्यांनी या दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्यांना थांबवून बॅग उघडायला सांगितले. बॅग उघडल्यावर सर्वांना धक्का बसला कारण त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन तपास सुरू केला, ज्यातून हा मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (वय ३०) याचा असल्याचे उघड झाले.

अर्शद अली सादिक शेखची हत्या शिवजीत सिंग आणि जय चावडा यांनी केली, हे आता समोर आले आहे. तपासात, अर्शदच्या पत्नी रुखसाना आणि जय यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या हत्या प्रकरणात नवीन मोड आला आहे. 

रुखसानाचं नेमकं काय कनेक्शन?

जय चावडा आणि शिवजीत सिंग हे दोघेही मूक बधिर असल्याने त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना साईन लँग्वेज एक्स्पर्टची मदत घ्यावी लागली. यानंतर रुखसाना आणि जय चावडा यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. रुखसानाने रविवारी तिचे WhatsApp चॅट डिलीट केले होते. त्याशिवाय, अर्शदची हत्या करण्यापूर्वी जय चावडा आणि शिवजीत सिंग यांनी अर्शदला अत्यंत हिंसकपणे मारहाण केली. त्यांनी अर्शदला विवस्त्र करून मारहाण केली आणि त्या मारहाणीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ त्यांच्या बेळगावातील मित्राला व्हिडीओ कॉल करून दाखवला गेला. हत्या केल्यानंतर, अर्शदचा रक्ताने माखलेला मृतदेह जय आणि शिवजीतने बॅगेत भरला. मृतदेहाची विल्हेवाट कोकणात जाऊन लावायची असं त्यांनी ठरवलं होतं. पण पोलिसांनी त्यांचा कट उघडकीस आणल्यामुळे हत्येचा उलगडा झाला. 

पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्शदची पत्नी रुखसाना ही देखील मूक बधिर आहे. तिला दोन मुलं आहेत. एवढंच नाही तर जय चावडा आणि तिचे संबंध होते. दोघंही विविध व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये होते अशीही माहिती समोर आली आहे. जय चावडाचं कुटुंब कॅनडात आहे तो चांगलाच श्रीमंत आहे. तसंच तो अविवाहीत आहे. त्याच्या पायधुनी येथील घरात अर्शद शेखची हत्या (Dadar Suitcase Murder ) करण्यात आली.

अर्शदच्या भावाने केलेले आरोप

अर्शदचा भाऊ इर्शादने आरोप केला आहे की, जय चावडा आणि रुखसाना यांच्यातील संबंधांमुळे अर्शदच्या हत्या करण्याचा कट आखला गेला. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. जय चावडा आणि अर्शद यांच्यात सहा महिन्यांपूर्वी एक भांडण झालं होतं, त्याचं कारण सुद्धा आम्ही शोधत आहोत, असे पोलिसांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने या माहितीची पुष्टी केली आहे.

अर्शद शेख आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लहान-मोठ्या कामांनी करत होता. क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने त्याची पायधुनीतील जय चावडा आणि शिवजीत सिंग यांच्याशी ओळख झाली. गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व एकमेकांना ओळखत होते. याच दरम्यान, जय चावडा आणि अर्शदची पत्नी रुखसाना यांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध फुलले. रुखसाना जय चावडासोबत अनैतिक संबंध ठेवत असल्याचा आरोप अर्शदच्या भावाने केला आहे.

Related Post