Mumbai

रतन टाटा रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर दिली प्रकृतीबाबत माहिती

News Image

रतन टाटा रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर दिली प्रकृतीबाबत माहिती

मुंबई: टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि देशातील नामांकित उद्योगपती रतन टाटा (86) यांना रक्तदाब कमी झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या अस्वस्थतेनंतर त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेण्यात आले आणि तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी स्वत: इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपली प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट केलं.
 

रक्तदाबाच्या समस्येमुळे ICU मध्ये दाखल

रतन टाटा यांना रात्री १२ वाजता अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांचा रक्तदाब खालावल्यामुळे त्यांना तत्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तब्येत स्थिर ठेवण्यासाठी ICU मध्ये उपचार सुरू केले. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख गोलवाला हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.

रतन टाटांची सोशल मीडियावर माहिती

रतन टाटा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रकृतीबाबत मीडियात पसरलेल्या अफवा फेटाळल्या. "माझ्या आरोग्यासंबंधी काही चुकीची माहिती पसरत आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की माझी वैद्यकीय तपासणी सुरू आहे, पण चिंता करण्यासारखं काहीही नाही," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी लोकांना शांत राहण्याचं आणि चुकीची माहिती न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.

सामाजिक क्षेत्रातील योगदान

रतन टाटा हे फक्त एक यशस्वी उद्योगपती नाहीत तर परोपकारी व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी 1990 ते 2012 या कालावधीत टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषवले असून, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान दिलं आहे. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने अनेक प्रकल्प हाती घेतले आणि समाजकल्याणाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले.

Related Post